तुम्ही
आवर्जुन
पाठविलेली तुमची कादंबरी
" साईड इफेक्टस्" तीन चार बैठकीत
वाचून झाली.अर्थात हे श्रेय लेखक म्हणून
तुमचेच मानतो.
सुरुवातीलाच तुमचे मनापासून अभिनंदन
करतो.त्याचं महत्त्वाचं कारण तुम्ही जो
विषय निवडला आहे त्यासाठी.या विषयावर
मराठीत फारशा स्त्री लेखिका नाहीत.क्वचित
महानगरात हा विषय हाताळला जातो.
अमहानगरी भागात हा विषय हाताळणं मी
धाडसाचंच मानतो.पुरुष लेखकही अशा
विषयाला हात घालताना खूपदा विचार करतील.पण तुम्ही हात तर घातलाच पण तो इतका
यशस्वीपणे की तुमचं कौतुक आणि
अभिनंदन करावं तेवढं थोडंच.
अशा स्त्री पुरुष संदर्भात विशेषतः शारीर
संबंधांच्या संदर्भात लिहिताना मोठं अवघड
आणि कसरतीचं कामंय.कधी लिहिता लिहिता तोल जाईल आणि ते सवंग,वाचकाला उद्दीपीत करुन
मुख्य
विषयापासून भरकटण्याची शक्यता अधिक
असते.पण तुम्ही ते टाळण्यात खूपच यशस्वी
झालात यात वाद नाही.
सर्व कादंबरी स्त्री पुरुष शारीर आणि
त्याबरोबरच होणा-या मानसिक गुंत्याशी
संबंधित असताना ती कुठेही तोल ढासळू देत
नाही.शृंगाराचे प्रसंगही तुम्ही बटबटीत भडक
होणार नाहीत याची काळजी घेतलीत आणि
त्यातलं सौंदर्यही राखलंत.ही खरंतर तारेवरची
कसरत होती.पण तुमच्या दीर्घ काळच्या
लेखन अनुभवानं हे आव्हान फारच लीलया
पेललं असं म्हणायला हरकत नाही.
तुमचा हा विषयच खूप अनोखा आहे.असं
घडू शकतं की नाही अशी शंकाही वाचकाला
न येऊ देता ,हे असं घडलं आहे आणि आता
पुढे काय करायचं हे ठामपणे सांगत राहतात.त्यात वाचकाला ओढून घेता आणि
आता पुढे काय? हा प्रश्र्न त्याच्यापुढेही
उभा करता.हे लेखक म्हणून तुमचं फार
मोठं यशय असं मी मानतो.सुरुवातीला मी तर विषय बघून हाबकलो होतो.आता इतका नाजूक विषय
कसा हाताळताय याची काळजी वाटत हैती.पण तुम्ही एका एका
बाईच्या मनात सहज उतरत गेलात.त्या घटनेतला तिचा सहभाग तिच्या भाषेत सहज उलगडत गेलात
आणि पहिल्याच भागात ( मंदा) जम बसवलात आणि पुढे वेगानं
सरकत गेलात की मग मी अवाकच होत गेलो.
म्हणून वाचकाला सहज ओढून घेत जाण्याची
जबरदस्त ताकद जाणवली.जी कथेत आणि
कथनातही प्रचंड जाणवत गेली.सबब मनापासून अभिनंदन.
शेवटी लेखक एक विश्र्व उभं करतो.ते वाचकाला आपलं वाटतं तेव्हा ते लेखन
यशस्वी होतं.ही लेखकाची मोठी कसोटी
असते.ती तुम्ही लेखनाच्या प्रदीर्घ अनुभवानं
सहज पार करता.त्यात वाचकाला पूर्ण
गुंतवून टाकता.हा अनुभव मी समरसून
घेतला.कादंबरी वाचून संपवली तेव्हा आपण
एक अनोखा,वेगळाच अनुभव घेतला हे
जाणवत गेलं.
हे महानगरात सहज खपून जाणारं किंवा जातंही .पण ते एका छोट्या खेड्याच्या
पातळीवर घडतं तेव्हा भयानक रुप धारण
करतं.विवाहबाह्य संबंध,त्यातून होणारी हिंसा
ही दररोज पेपरात वाचायला मिळते.कोल्हापूरला असताना दै.पुढारी
फारच वाचनात यायचा.तेव्हा कायद्याचा
अभ्यास करताना वाचलेल्या क्रिमीनल प्रोसीजर कोडच्या सेक्शनची उजळणी व्हायची.नवरा
बायकोनी मिळून प्रेयसीला
मारलं किंवा नवरा प्रेयसीनं मिळून बायकोला
मारलं तेही भयानक क्रूरपणे ,आणखी इतर
विविध प्रकारचे गुन्हे त्यात असायचे.तेव्हा
वर्गात शिकलेले सगळे सेक्शन आठवायचे.
पुढे विजय तेंडुलकर यांच्याशी या विषयावर
बोलताना,त्यांच्या नाटकांत येणारी हिंसा
याबद्दल बोलताना ते पटवून सांगायचे,प्रत्येक
माणसात हिंसा कशी असते आणि ती
प्रसंग आल्यावर कशी बाहेर पडते हे ते
पटवून द्यायचे.या अभ्यासासाठीच त्यांना
नेहरु स्काॅलरशीप मिळाली होती.हे सगळं
आठवत गेलं.
मुळची घटनाच ,म्हणजे दहा पंधरा बायकांनी
जयरामला पहाटे पहाटे दगडांनी ठेचून मारणं
हे भयानकच.पटायला अवघडच.नंतर तो
आरोप पुरुषांनी आपल्यावर घेणं हे तर फारच
अफलातून वळण.पुरुषी मानसिकतेचं वर्चस्व
सिद्ध करण्याचा एक केविलवाणा प्रयोग.हा
तुमच्या कादंबरीचा फारच ताकदीचा मुद्दा.आणि पुढे तथाकथित कुटुंब व्यवस्था
टिकविण्याचा पुरुषांचा दुबळा प्रयोग.त्यात
पुन्हा बळी जाणा-या स्रीयाच हे फारच ताकदीनं आलंय.यात पुरुष इतका लाजीरवाणा वाटत
गेला की तथाकथित पुरुषी
व्यवस्था कोसळून पडली,कुटुंब संपली,लग्नं
मोडली,स्त्रीयांच्या आत्महत्यांची लाट आली.
पुरुष उघडा पडत गेला.त्याला काहीच कळेना.स्वत:चा तथाकथित अहंकारही बाजूला ठेवता
येईना.डोळ्यांसमोर कुटुंबं,बायको,मुलंबाळं उध्वस्त होताना लाचारपणे पहाण्याशिवाय
काहीच हातात
उरले नाही.या घटनेचे झालेले " साईड इफेक्ट्स" त्याच्या लक्षातच आले नाहीत.आणि सगळं
गाव कोसळून पडलं.हे
तुम्ही विलक्षण चित्रीत केलंय.
या सगळ्यानंतर एक मुलगी जी यात होरपळली आहे ती प्रिया इतर स्त्रीयांना
विशेषत: प्रतिभाला बरोबर घेऊन जो मार्ग
काढते आणि इतर बळी जाणा-या बायकांना
वाचवते,कोसळत्या कुटुंबांना वाचवते आणि
विस्कटत गेलेल्या गावाला वाचवते.पुन्हा स्वत:
उभं राहून सर्वांना उभं करते आणि एक
दुर्मिळ उदाहरण घालून देते.तेव्हा ती कादंबरी
निखळ बाईची होते.बाईच्या प्रचंड आशावादाची होते.हे कादंबरीचं फारच दमदार वळण आहे
असं मला वाटतं.इतिहासानं सिद्धच केलंय.बाई मोडत नाही. ती शेवटपर्यंत लढत राहते.या
कादंबरीत हेच होत जातं.ही कादंबरी निखळ स्त्रीची कादंबरी आहे.ती तथाकथित शहरी
स्त्रीवादी न होता सगळ्या विस्कटलेल्या गावगाड्याला उभं करते .हे या कादंबरीचं
वेगळेपण आहे असं मला वाटतं आणि मराठी साहित्यात तरी तीची दखल या वेगळेपणामुळं हमखास
घेतलीच जाईल हा मला विश्र्वास आहे.बाईला केवळ लाचार बाई,बळी जाणारी बाई दाखवता
दाखवता तुम्ही तिला स्वबळावर उभं करता.त्याबरोबर त्यांच्या समूहाला उभं
करता,जाणत्या नव्या विचाराच्या पुरुषाला उभं करता.तिच्या बळानं अख्या गावाला उभं
करता.तेव्हा ती बाई बाई न राहता एक पराक्रमी,खंबीर,दूरदृष्टीची बाईमाणूस बनत
जाते.हे या कादंबरीचं मोठं यश आहे असं मला वाटतं.वाचकालाही विस्कटलेल्या मन:
स्थितीतून बाहेर काढून एक आशावादी नव्या उगवणा-या दिवसाकडे बाई अंधारातून बाहेर
काढून घेऊन जाते.वाचक एक खोल उसासा
सोडतो हे कादंबरीकार म्हणून तुमचं मोठं
यश आहे हे निर्विवाद.
यासाठी तुम्ही स्वीकारलेल्या भाषा आणि
शैलीबद्दल थोडं लिहितो आणि थांबतो.
तुम्ही सांगली सातारची स्वीकारलेली ग्रामीण
बोली भाषा फारच ताकदीनं वापरली आहे.जरी काॅम्प्युटर,पेन ड्राइव्ह,फोटोशाॅपी
येत असली तरी ती बोली भाषेचा आवाज
सोडत नाही.संवाद आणि मनातल्या संवादातही ती विलक्षण ताकदीनं येते.त्यामुळं
सर्व व्यक्तिरेखा आणि सगळं गावही ताकदीनं
उभं राहतात.संवाद फारच आवडले.त्यात ती माणसं ,स्त्रीया सुंदर उभ्या राहतात.त्यांची
तडफड जाणवत राहते.कधी त्यात तोच तोपणा येतोही.पण विषयाच्या गतीत तो खपून
जातो.तुम्ही विषय विलक्षण गती मान करून मांडला आहे तरीही काहीवेळा थोडा कंटाळा आला
तेव्हा थोडं एडिटिंग झालं असतं तरी चाललं असतं असं वाटलं. विशेषत: प्रिया आणि
प्रतिभा यांच्या मनोगतात .
तुम्ही जो आत्मनिवेदनाचा प्रथमपुरूषी ( की प्रथमस्त्री ?)फाॅर्म स्वीकारलाय तो मला
आवडला.तो "ययाती"पासून प्रसिद्ध आहेच.त्यामुळं घडलेल्या घटनांना एक अधिकृतता मिळत
गेली.अविश्वास संपला.तृतीयपुरूषी ( तृतीयस्त्री ?)
निवेदनात खूपच कष्ट घ्यावे लागले असते.
वाघमारे नसते तर बरं झालं असतं का असं
वाटून गेलं.कारण त्यांच्यात होत गेलेला
बदल आणि त्यांच्यातल्या पुरुषी अहंकाराचा
पराभव प्रतिभाच्या निवेदनात आलाय असं
वाटलं.तिच्याच निवेदनात शेवटही आधीच
ध्यानात आला.सबब जयरामच्या बायकोचं
वंदनाचं शेवटचं मनोगत हा मग फक्त
उपचारच राहतो असं वाटलं.प्रतिभा आणि
प्रिया फार बोलताना जाणवल्या.त्यामानानं
बाकी बाया मर्यादेत जाणवल्या.
आणखी एक .कादंबरीचं नाव मराठीत दिलं असतं असं वाटून गेलं.त्यावर थोडा विचारही
केला.काही नावं सुचलीही.पण आता नवा तरुण वाचक लक्षात घेता हे नाव फार इंग्रजी वाटत
नाही.आता हा आपल्या बोलण्यातही सहज येणारा शब्द आहे.त्यामुळे फार काही नुकसान होत
नाही.असो.
एकूण एक दमदार ख-या अर्थानं बाई माणसांची कादंबरी देऊन मराठी साहित्यात
अमुल्य भर घातलीत याबद्दल मराठी वाचक
आपले ह्यणीच राहतील.ही कादंबरी तुम्हाला
एक वेगळी ओळख देईल हे निर्विवाद वाटतं.
तुमचं मराठी साहित्यात असलेलं स्थान
अधिक बळकट करेल हे नक्की.ही कादंबरी
तुम्हाला आणखी मानमरातब मिळवून देईल
हा विश्र्वास वाटतो.
तुमच्या सारख्या ज्येष्ठ लेखिकेला मी आणखी
काय सुचना करणार ! मी कुणी समीक्षक नाही.समीक्षेचा माझा विद्यापीठीय अभ्यासही
नाही.मी विज्ञान,कायदा,बॅन्कींगचा विद्यार्थी.जे जाणवलं ते एक गंभीर वाचक आणि लेखक
म्हणून.ते प्रामाणिकपणे मांडलं.काही कमीजास्त,तुमचा अवमान करणारं लिहिलं
असेल तर माफ करा.तुम्हाला दुखावण्याचा
हेतू नक्कीच नाही.या सगळ्याला केवळ
आस्वादक न मानता एक सहसर्जक
आकलन म्हणून बघावं इतकंच.बाकी तुमच्या
पुस्तकांचं शतक पूर्ण व्हावं आणि ते
बघायला मी असावं इतकंच ! तुम्हाला आणि
तुमच्या लिखाणासाठी नेहमीच सदिच्छा
आहेत आणि त्या कायम राहतीलच.
एक सशक्त वाचनाचा अनुभव दिलात
याबद्दल मनापासून अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो.
प्रमोद मनोहर कोपर्डे
सातारा
"साईड
इफेक्ट्स"
ही कादंबरी मला अशी भावली......
नीलम माणगावे यांची " साईड इफेक्ट्स" ही कादंबरी दोन दिवसात वाचून झाली.एकदा
कादंबरी हातात घेतली ती वाचूनच खाली ठेवली.ही कादंबरी एका वेगळ्या विश्वात घेऊन
जाते. कादंबरी वाचताना आपण कादंबरीतील व्यक्तिरेखेचे बोट धरून चालू लागतो.त्यांच्या
सुखदुःखात एकरूप होतो.आपण कादंबरी वाचत आहोत हे विसरतो.आपण एक चित्रपट बघत आहोत असा
भास निर्माण होतो.कादंबरीच्या प्रस्तावनेत लेखिका सांगतात साधारण १५-२०
वर्षांपूर्वी वर्तमान पत्रातून आलेल्या वेगवेगळ्या गावात घडलेल्या दोन बातम्यांनी
मी हादरले त्याच वेळी या कथेचे बीज मला सापडले.या कादंबरीशी त्या बातम्यांचा संबंध
फक्त निमित्तमात्र आहे. बाकी व्यक्तिरेखा काल्पनिक आहे.पण कादंबरी वाचताना कुठेही
या व्यक्तिरेखा काल्पनिक आहेत असे वाटत नाही. सविता ,चंद्रा, मंजुळा, रत्ना,नजमा,
हौसा,या व्यक्तिरेखा आपल्या आसपास दिसतात.स्त्रियांची होणारी कुचंबणा शहरात काय
खेड्यात काय सगळीकडे सारखीच.तिच्या भावनांना, तिच्या मताला, तिच्या म्हणण्याला
किंमत असतेच कुठे? ती किती ही शिकली,तिने नोकरी केली,ती स्वतंत्र असली तरी, तिला
पूर्ण स्वातंत्र्य मिळत नाही.तिचा पाय संसारात, घरात मुलांच्यात, रुढी परंपरेत
अडकलेला असतो. स्त्रिया कधी आपलं मत स्पष्टपणे सांगू शकत नाहीत. खेड्यात तर तिला
घराबाहेर पडताना ही सासू, सासरे ,नवरा ,दीर ,मुले ,यांना विचारावे लागते.
स्त्रियांच्या साध्या-साध्या इच्छा पूर्ण होत नाहीत. त्या मोकळेपणाने बोलू शकत
नाहीत. तर अशावेळी लैंगिक सुखाच्या तिच्या कल्पना ती कुणा समोर बोलणार? तिची तळमळ
कुणाला समजणार? तिच्या मनाविरुद्ध ती रोज नवऱ्याकडून ओरबाडली जाते.तिला तो माणुस
नव्हे यंत्रच समजतो. तिच्या मनाचा, समाधानाचा, विचार कोण करतो ?
या कादंबरीत जयराम या एका पुरूषा सोबत अनेक स्त्रिया राजीखुशीने कशा काय संबंध
ठेवतात? हे कृत्य करण्यासाठी त्या का तयार होतात? कश्या तयार होतात?हे लेखिकेने
अतिशय ओघवत्या शैलीत मांडले आहे.
परपुरषाशी विवाहबाह्य संबंध. हा विषय अतिशय संवेदनशील. या बद्दल तोंड उघडून
बोलण्याची हिम्मत होत नाही. चार चौघात बोलतानासुद्धा आपल्याला कोणी ऐकत नाही ना?
बघत नाही ना ?ऐकले तर काय म्हणतील ? यांची काळजी घेतली जाते अशावेळी या विषयावर उघड
उघड कादंबरी लिहिणे म्हणजे शिवधनुष्य पलण्यासारखे होते. सिद्धहस्त लेखिका नीलम
माणगावे यांनी हे शिवधनुष्य पेलले. कादंबरीचा विषय बंडखोर आहे.विषय वाचून हा विषय
कसा मांडला असेल या बद्दल उत्सुकता निर्माण झाली होती.
स्त्री मनाची होणारी घुसमट,तिचा एकटेपणा, शारीरिक संबंधांचे आकर्षक, शारीरिक
झळ,विवाहबाह्य शरीरिक संबंध हे कादंबरीतील व्यक्तिरेखेच्या मांडणीतून, संवादातून
उलगडत जाते. स्त्री मनाची दाहकता समाजासमोर हळुवार पद्धतीने मांडण्यात लेखिकेला यश
मिळाले आहे.
गावातील सगळ्या बायका मिळून जयरामला ठेचून मारतात. तेव्हा गावात एकच वादळ उठते.
अनेक स्त्रियांचे जयरामशी संबंध होते हे जेव्हा कुटूंबा समोर आले,समाजा समोर
आले.तेव्हा कुटुंबे उध्वस्त झाली. स्त्रियांच्या आत्महत्येचे सत्र सुरू झाले,माणसे
कोलमडून पडली,मुलींची ठरलेली लग्ने मोडली, प्रत्येकजण आपल्या घरातील स्त्रीला
संशयाने बघू लागला.एका घटनेचे गावात झालेले हे साईड इफेक्ट्स वाचकाला हादरून
सोडतात.हे का झाले? कसे झाले? पुढे काय ? यात वाचकाला खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य
लेखिकेच्या लेखणीत दिसून येते.
कादंबरीत कुठेही अतताई पण दिसत नाही, कुठे ही आक्रोश दिसत नाही, कुठे ही बंड दिसत
नाही. तरी ही सकारात्मक विचार करण्यास ही कादंबरी भाग पाडते
लग्न झालेल्या पुरुषांनी अनेक स्त्रियांबरोबर संबंध ठेवले तर त्यात समाजाला काही
वावगे वाटत नाही आणि त्या पुरूषाला माझे काही चूकले आहे,मला माझे लाजिरवाणी जीवन
संपवले पाहिजे, मी आत्महत्या केली पाहिजे कधी वाटत नाही, त्या कृत्याची लाज ही वाटत
नाही. समाज या गोष्ट स्विकारतो.बायका ही या गोष्ट स्विकारतात, तो राजरोस हिंडतो. पण
हीच गोष्ट स्त्रियांच्या बाबतीत घडते झाली तेव्हा मात्र नवऱ्यापासून समाजापर्यंत
सगळे तिला कुल्टा समजतात, तिच्या जगण्याचा अधिकार नाकारता, तिला शब्दांनी टोचून
टोचून घायाळ करतात, तिचे जीवन नरक बनवतात,अश्यावेळी आत्महत्ये शिवाय तिच्या पुढे
कोणताच पर्यायच शिल्लक राहत नाही. समाजात पुरुषांना आणि स्त्रियांनावेगळा न्याय का
?
विवाहबाह्य संबंध चांगले नाहीत त्याचे समर्थन लेखिका ही करत नाही पण "आज्ञत्महत्या
करण्याएवढी ही मोठी गोष्ट नाही मोठी गोष्ट नाही"हे समजून घेतले पाहिजे.तिला समजून
घेतले पाहिजे,तिचा संसार वाचला पाहिजे,ती जगली पाहिजे. हा विचार लेखिकेने कादंबरीत
प्रकर्षाने मांडला आहे.स्त्रियांना समान न्याय मिळाला पाहिजे यासाठी लोकप्रबोधन
सर्वात महत्त्वाचे आहे.लेखिकेने कादंबरी लिहिताना ओघवत्या शैलीत हे लिहिले आहे.
एखादी विचित्र घटना घडली तर शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात त्याचे परिणाम जास्त
परिणामकारक होताना दिसतात. त्या गावाचे जनजीवन ढवळून निघते.त्याचे परिणाम गावाला
भोगावे लागतात. सारा गाव कसा होरपळून निघतो.हे लेखिकेने कादंबरत ही दाखवल आहे.
नीलम माणगावे यांचे मी अभिनंदन करते इतका गंभीर विषय किती सहजतेने सोप्या पद्धतीने
कादंबरीत मांडला आहे या कादंबरीतील व्यक्तिरेखा, त्यांची भाषा, त्यांचं वावरणं,
सारे एका मर्यादेत आहे कुठेही बीभत्सपणा आढळत नाही, प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभा
करण्याचे सामर्थ्य लेखणीत आहे म्हणून कादंबरी सलग वाचली जाते पुढे काय होईल, पुढे
काय होईल, ती अशी का वागली, तिचे पुढे काय होणार, हे प्रश्न पडतात आणि ते
सोडवण्यासाठी आपण पुढे वाचत राहतो.
प्रिया आणि प्रतिभा ही प्रकरणे या कादंबरीचा गाभा आहे. कोलमडलेले गाव आणि उध्वस्त
झालेली मने पुन्हा उभी करण्यासाठी त्यांनी केलेली धडपड महत्वाची आहे. या प्रकरणात
याचे सविस्तर विवेचन केले आहे. जीव अनमोल आहे. जीव वाचला पाहिजे. स्त्रियांच्या
हातून जर चूक झालीच तर आत्महत्या हा त्याचा पर्याय होत नाही.ती माणूस आहे. ती चुकू
शकते.हे स्विकारले पाहिजे.जगणं महत्त्वाचं आहे हेच या कादंबरीचे सारं आहे असे मला
वाटते.
एक वाचक म्हणून मला ही कादंबरी जशी भावली तसे मी माझे मत मांडले.साईड इफेक्ट्स ही
कादंबरी ग्रामीण जीवन अधोरेखित करणारी आहे.विवाहबाह्य संबंधा बाबत ग्रामीण महिला
कसा विचार करतात हे ही कादंबरीतून स्पष्ट होते.स्त्री माणूस आहे.ती चुकू शकते.तिने
नकळत चूक केली तर चूक सुधारण्याची संधी तिला ही मिळाली पाहिजे.हे समाजाने ,पुरूष
वर्गाने समजून घ्यावे ही प्रांजळ इच्छा लेखिकेने कादंबरीतून मांडली आहे.
ह्या कादंबरी वर चांगला चित्रपट तयार होईल एवढ्या तगड्या विषय कादंबरीत मांडला
आहे.ही कादंबरी समाजाला एक नवा विचार देईल असे वाटते.तो विचार पचविण्याची ताकद
वाचकांच्या असावी म्हणजे झालं.
सौ.वंदना अशोक हुळबत्ते
सांगली
छळणाऱ्या प्रश्नांचे मोहळ
आजूबाजूची
भयावह परिस्थिती आणि मनातील घुसमट याचा सुंदर मिलाप झाला की संवेदनशील
कविता जन्म घेते. विदारक घटनेचा हात धरून थेट वाचकांचा मनाचा ठाव घेऊन कविता सत्य
नग्नतेचा निखारा काळजावर ठेवण्याचे धाडस संवेदनशील कवयित्री नीलम मानगावे यांनी
प्रगल्भतेने "आज: मगरीच्या जबड्यात पाय.. उद्याचे काय ? " जीव टांगणीला लावून
येणारे हे ब्रह्मराक्षस प्रश्न उत्कटणे काव्यसंग्रहातून उतरविले आहे.कवयित्री नीलम
माणगावे साहित्य विश्वामध्ये अधोरेखित झालेल्या कवयित्री आहेत. त्यांच्या मनात
अस्वस्थेची घालमेल चालू असते. आजूबाजूची भयावह परिस्थितीच त्यांना कवितेत शिरण्याचे
आमंत्रण देते. कवयित्री नीलम माणगावे यांचे हे अडुसष्टावे पुस्तक संवेदनशील
आशयसंपन्नांचे बळ घेऊन साहित्य दरबारात दाखल झालेले आहे.
रुळलेली, मळलेली,प्रस्थापितांच्या वाटेवरचा हा प्रवास नसून काळाच्याही पुढे
त्यांची प्रबोधनात्मक पावले पडतात. पायाखालची काटेरी वाट व डोळ्यात आशावादी किरणे
घेऊन उगवत्या सूर्याच्या दिशेने अन्यायग्रस्त,शोषित ,पीडित यांना सोबत घेऊन
निघालेला हा प्रवास कवीच्या शब्दाने त्यांच्या विझत चाललेल्या जीवनात उभारीची
रांगोळी घालते.
या काव्यसंग्रहाच्या शीर्षक कवितेत कवयित्री .
म्हणते
" धर्म खतरमें है !
जात खतरेमें है !
म्हणत गळा काढणारे
गल्लोगल्ली आहेत
पण माणूस खतरेमें है !
असं कोणीच म्हणत नाही "
माणसाच्या जगण्याची भाषा कोणीच बोलत नाही. ही सल कवयित्रीला सलते. संदेशवाहक व
वाचकांना चिंतन करावयास भाग पाडणारी ही रचना
नसबंदी ही कविता विचारांना कलाटणी देणारी आहे.पुरुषांची नसबंदी झाली तरी ते
त्याचे वैयक्तिक प्रश्न असतात.समाजातील विदारक दृश्य बघून प्रतिकारासाठी मुडदाड
लोकांचे हात किंवा आवाज उठत नाही तेव्हा कवयित्री उद्विग्न होते
"आमच्या आवाजाची नसबंदी !
मेलेल्यांना आवाज कुठं असतो ?"
कवयित्रीने हा प्रश्न उभा करून रडायला नव्हे तर लढायला शिकवते त्यांच्या कविता
समाजाच्या दुखऱ्या जखमेवरचा झाडपाला आहे. विस्कटलेल्या मनाला उभारी देणारा आहे.
कवयित्री निर्जीव वस्तूंनाही आपल्या प्रतिभेने त्यात प्राणवायू भरते. स्त्री
सोशिक ,भावूक, रिते होईपर्यंत प्रेम करणारेही करुणामय मूर्ती या प्रतिमा गाडून आता
ती स्वतःला विकसित करू लागलीस्वत:ला प्रश्न विचारू लागली "कांदा "या कवितेत
कवयित्री पुरुषांना एक मोलाचा सल्ला देते
"कांदा चिरताना हवं तेवढं रडून घ्यावं बायकांनी
पुरुषांनाही कधी कधी
कांदा चिरायला हरकत नाही
कांदे नाकाने सोलले तरी
किंवा बुक्कीने फोडले तरी
जो त्याच्या वाटेला जातो
त्याला रडवतोच "
ही सुचक कविता उत्कट भावनेचा आविष्कार आहे.
समाजातील विषमता आजूबाजूची भयावह परिस्थिती गर्भगळीत चेहरे, आता स्वतःला चाचपून
पाहण्यासाठी वरचेवर चिमटे काढावे लागतील. खांद्यावर प्रश्नांचे ओझे वाढतच आहे.
अशावेळी कवयित्री "युद्ध नको मज बुद्ध हवा" ही सजग कविता आपणासमोर ठेवते
"शाहू फुले आंबेडकर
बसवेश्वरांचा न्याय हवा
दाभोळकर पानसरे जगण्यासाठी
हिटलर नको गांधी हवा
येशू हवा महावीर हवा नानक हवा
पैगंबर हवा चार्वाकाचा विचार हवा
विनोबांचा आचार हवा
फुलांनाही जगायचं आहेपाखरांना अवकाश हवा
युद्ध नको ..."
ही काळाची गरज आहे हेच विचार आपल्याला सद्यस्थितीत तारु शकतात हा विश्वास ही
कविता देते.
या संग्रहातील प्रत्येक कविता जगण्याचा स्वतंत्र विचार देते. काही कवितेच्या
शीर्षकांचा नामोल्लेख उद्घोषित करावसे वाटते
लोकशाहीच्या दारात ,शेपूट फुटलेले माणसं, त्यांच्या कृपेनं,अक्षर, लाल डाग,धार या
कविता आपल्या मधून लवकर बाहेर पडत नाहीत. प्रश्नाचे मोहोळ घोंगावत राहते. या
काव्यसंग्रहातील कोणतीही कविता कुठूनही वाचू शकता ती आपलीच जगण्याची भाषा बोलते.
कविता अंधारमय पारंपरिक रुढींचा परिघछेद करून परिवर्तनाची ज्योत पेटवते. चाखोरीबद्ध
जीवनाला धक्का देणाऱ्या कविता म्हणूनही याचा उल्लेख करावा लागेल
एकावन्न कवितांचा स्फुल्लिंग आपल्याला चेतना देतो.आत्मपरिक्षण करायला लावतो. हे
या काव्यसंग्रहाचे वैशिष्ट्य आहे. शब्द सामर्थ्य च्या प्रतिभेची ताकद आहे. मुखपृष्ठ
वर्तमानच्या प्रश्न कोशात गुरफटून टाकतो. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी
अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांची प्रस्तावना उत्कटतेचे वेद लावते. आत डोकावण्याची
चिकित्सक वृत्ती देते. शशी किरण पब्लिकेशन कोल्हापूर यांनी आपल्या प्रतिष्ठेला जपत
एक प्रतिभावंत, आशयसंपन्न काव्यसंग्रह साहित्य दरबारात दाखल केला आहे.
कवयित्री नीलम माणगावे यांनी स्त्रीपणाची झूल उतरून निर्भीडपणे
समाजव्यवस्थेला,परंपरेला तिखटपणाने प्रश्न विचारलले आहेत. त्यांना त्यांच्या काव्य
कृतीबद्दल शुभेच्छा
मारुती कटकधोंड
सोलापूर
आदरणीय,
नीलम माणगावे ताई,
नमस्कार,
हे पत्र
फक्त धन्यवाद मानण्यासाठीच लिहित नाहीये. तर प्रत्येक भारतीयाच्या जगण्याचे
गमक आपल्या निसर्गनियमांच्या आणि अर्थातच भारत स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेने
म्हणजेच आपल्या संविधानाने आपल्याला घालून दिलेल्या एका अदृश्य पण जगण्याच्या
नियमांच्या मजबूत चौकटीत आहे, हे आपण खूप वेगळ्या पद्धतीने ‘संविधान ग्रेट भेट’ या
पुस्तकातून समजावून सांगितलं आहे. याची आज किती गरज आहे, हे पावलोपावली लक्षात
येतं. आज म्हणजे आजच्याच परिस्थितीत नाही तर जगण्याच्या प्रत्येक टप्प्यावर संविधान
आपल्याला कसं जगायचं हे सांगतं आणि ते तसं का सांगतं हेही आज आपल्या पुस्तकामुळे
कळालं.
पत्र लिहिण्याचा हेतू जरा वेगळा आहे. मला वाटतं आपलं संविधान हे उपजतच आपल्या
संस्कारांमध्ये आहे, होतं. पण, नंतरच्या काळात द्वेष आणि मस्तरामुळे त्या
संस्कारांची हानी झाली अन् काळाच्या प्रत्येक टप्प्यावर नियमांची चौकट आतापर्यंत
कोणी ना कोणी आखत आलं आणि त्याप्रमाणे ती राज्यव्यवस्था चालावी, असा प्रयत्न होत
आला. मात्र, अचानक काळोखातून लख्ख प्रकाशात आल्यावर धडपडण होऊ नये म्हणून भारताला
मिळालेलं संविधान हे फक्त हा देश चालविण्याच्या नियमांचं बाड नव्हतं, तर देशाच्या
सर्वोच्च व्यक्तीपासून ते आइच्या उदरातून जन्म घेत असलेल्या प्रत्येकाचा विचार
करून त्याचं जगणं सुकर व्हावं हा विचार करणारी ‘दायी’ची भूमिकाही तिनं निभावली आणि
यापुढेही ती तेच करत राहणार आहे. प्रश्न आहे तो आपण आपलं ‘संविधान’ कधी समजून घेणार
याचा. प्रत्येकाने संविधान वाचलं पाहिजे का? आणि वाचलं तरी ते किती समजणार आहे? मग
काय वाचलं म्हणजे संविधानाची मूलतत्त्वे समजतील. याला उत्तर खुद्द संविधानाच्या
प्रास्ताविकात इतक्या मोजक्या शब्दात दिलं आहे की त्याचं काटेकोर पालन केलं आणि
संविधान नाही वाचलं तरी ते वाचल्यासारखंच नव्हे तर स्वत:त रुजल्यासारखं होर्इल. जसं
की, बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्इनंही स्वयंपाक करताना त्यांना चमच्यात वरण देऊन
विचारलं असेल. ‘थोडं चाखून सांग मीठ कसं आहे?' अथवा आर्इ मला स्वयंपाक घरात बोलावून
याची चव सांग कसं वाटतयं हे का विचारायची. हे आज आपलं पुस्तक वाचताना कळालं. म्हणून
मी सुरूवातीला निसर्गनियम आणि नंतर संविधानाने हे आपल्याला दिलं असं म्हणालो.
आज संविधान सर्वाधिक कोणात रुजलयं म्हणजे स्त्रीमध्ये की पुरूषात? असा विचार केला
तर ते सर्वाधिक स्त्रीमध्ये रुजलं आहे, हे आतापर्यंत अनुभवत आलो होतो ते आपल्यामुळे
लक्षात आलं. पुरूषांनी कितीही आणि कितींदाही संविधान वाचलं तरी त्यांना जे समजणार
नाही. कारण वाचलं म्हणजे कृतीत येर्इलच असे नाही. अर्थात सगळेच पुरुष असे असं नाही.
मात्र, स्त्री आपल्या कृतीतून आणि आपल्या जगण्यातून संविधान रुजवित आली आहे आणि ती
पुढेही रुजवित राहणार आहे. पण आता बदलणार्या आर्इपणाचा यात विचार करायला हवा.
एखाद्या आर्इनं स्वयंपाक करताना आपल्या कुटुंबातील सदस्यांना एखाद्या पदार्थ तयार
होण्यापूर्वी त्याच्या चवीबद्दल, आवडीनिवडीबद्दल विचारलचं नाही तर? आता असं वारंवार
अनेक कुटुंबांमध्ये (देशांमध्ये) घडताना दिसू लागलं आहे. त्यामुळे त्या कुटुंबातील
सदस्य फास्टफूडच्या आहारी जावू लागले आहेत. नवरा मित्रांचे डबे नाही, तर
खाऊगल्ल्यात डोकाऊ लागला आहे. यातून कुटुंबाचं संतुलन बिघडू लागलं आहे. वाढतं पोट,
शूगर, बिपी अन् यातून आरोग्यावर होणारे परिणाम आणि कुटुंबाची (देशाची) हानी होत
आहे, असंही आता दिसू लागलं आहे. त्यामुळे स्वयंपाक करताना आर्इने इतरांच्या चवीचा
विचार करण्यामागचं तत्त्वज्ञान काय ही आतापर्यंत जगाला न कळालेली गोष्टी आपण
पुस्तकातून उलगडून सांगितली आहे. संविधान लिहिताना बाबासाहेबांनी प्रत्येकाच्या
चवीचा, जगण्याचा आणि हक्क-कर्तव्यांचा किती बारकार्इने विचार केलाय यातील ‘गंमत’
आता लक्षात येते. म्हणजेच कुटुंब सक्षम असेल तर देश आपोआपचं सक्षम होतो, हा वेगळा
अनुभव आज मला आणि माझ्या कुटुंबाला मिळाला.
जगताना आपण जे शिस्तीत जगतो आहोत, हे चुकीचं करतोय का? असा प्रश्न कधीकधी छळतो.
शाळेतील प्रत्येक शिक्षकानं, कुटुंबातील सदस्यांनी, चांगल्या मित्र-मैत्रिणींनी आणि
भेटणार्या प्रत्येकाने दिलेली ही शिस्त म्हणजे काय? तर तेही संविधानाने दिलेली देणं
आहे हे आज लक्षात आलं. शिस्त अंगवळणी पडताना त्या शिस्तीचा आणि संविधानाचा काही
संबंध असेल असं वाटलं नव्हतं. पण या शिस्तीमुळे जगण्यात आलेला कणखरपणा, स्पष्टोक्ती
मला माहितं नव्हती, असं नाही तर आपण ज्या पद्धतीने जगतो आहोत तेच जगणं आपल्या पुढील
पिढ्यांनी स्वीकारावं यासाठीचा संघर्षदेखील आज आपले पुस्तक वाचताना स्पष्ट झाला. १६
जुलैला दुपारी ४ च्या सुमारास आपलं पुस्तक पोस्टाने मिळालं आणि झपाटल्यासारखं
वाचायला घेतलं. २ तासात वाचूनही झालं. संविधान वाचताना हसताय काय? असा प्रश्न वकिल
बायको संगीतानं केला. संविधान ही गोष्ट हसण्यासारखी नक्कीच नाही. पण, आपण ज्या
पद्धतीने संविधान समजावून सांगितलं आहे. ते वाचताना मनात हलकिशी खसखस पिकते अधेमधे
गंभीर होतो तर कधी चेहरा प्रसन्न होतो आणि आपण याच पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करतो
आहोत. संविधानाने घालून दिलेल्या शिस्तीत, न्यायात वाढतो आहोत या आनंदाची ‘ती’ खसखस
होती. त्यानंतर पुढील २-३ तासात बायकोनं स्वयंपाक आणि घरातील काम करता करता आपलं
पुस्तक अधून-मधून हसत, भावनिक होतं वाचून काढलं. किती गोड पद्धतीनं संविधान समजावून
सांगितलं आहे हे तिच्या ओठी होतचं पण, आपण संविधान समजावून सांगताना आणि संविधानात
आर्इ-बार्इची भूमिका किती महत्त्वाची आहे, याचा तिला अभिमान वाटत होता. आता परीक्षा
होती ती आतापर्यंतच्या आमच्या जगण्यातून आमच्या मुलांमध्ये संविधान किती रुजलयं हे
तपासण्याची.
गंमत म्हणून का होर्इना, आपल्या पुस्तकाच्या आधारे काही प्रश्नांनी आम्ही दोघांनी
मुलांची मुलगी (९वी) आणि मुलगा (६ वी)शी गप्पांना सुरूवात केली. तेव्हा काही धक्के
आणि आश्चर्यकारक गोष्टींचा आम्ही सामना केला. प्रतिप्रश्न, वादविवाद, पुन्हा
त्यातून नवे प्रश्न आणि पुन्हा नवे वाद.. जगण्याच्या नव्या नियमांची ओळख आणि पुन्हा
तोच आनंद हे सातत्यानं दोन तास सुरू होतं. आर्इ स्वयंपाक कोणासाठी करते? तो करताना
ती आपल्याला विचारात घेते का? आपल्या प्रत्येकाची चव वेगवेगळी असते तरी तिने केलेला
स्वयंपाक सगळ्यांना कसा काय आवडतो? तिची सर्वसमावेशकता, सार्वभौम, समानता, एकात्मता
तिच्या स्वयंपाक अथवा तिच्या जगण्यातून कसा काय संपूर्ण कुटुंबाला (येथे देश म्हणून
विचार केला तर लक्षात येर्इल) सावरते, अशा अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली आणि
अखेर स्वयंपाक करताना आर्इ आपल्याला बोलावून त्यात मीठ तिखट कमीजास्त आहे का हे
तपासून सांग असं का म्हणते, याचा उलगडा आम्हा सगळ्यांना झाला. आणि आतापर्यंत
शिस्तीत जगण्याचा अट्टाहास वाया केला नाही, याचा आनंद मनात अलगद सुखावला. हेच
निसर्गनियमांना आणि संविधानाला अपेक्षित आहे का? तर त्याचं उत्तर ‘हो’ असचं आहे. हे
आतापर्यंत स्पष्ट नव्हतं ते आपल्या पुस्तकाने मनात पक्क केलं. आपण संविधानाने घालून
दिलेल्या स्वातंत्र्यात (हक्क, अधिकार, कर्तव्य बंधनात) जगतो आहोत का? तर त्याचही
उत्तर ‘हो’ असचं मिळालं. हे पुस्तक फक्त संविधान कस आहे हे सांगत नाही तर आपण
संविधानाप्रमाणे जगतो आहोत का, हे स्वत:ला विचारायला लावतं. हे आपल्या संविधानाचं
आणि ते समजावून सांगणार्या आपल्या लेखिनीचं यश आहे, असं मला वाटतं. माझी दोघे मुले
आपलं पुस्तक वाचून त्यावर लिहिणार आहेतच.
समाजाच्या सगळ्याचं अपेक्षा आपला देश पूर्ण करत नसेल पण, त्या पूर्ण व्हाव्यात आणि
कोणी एकलव्य होऊ नये, यासाठीची कटिबध्दता संविधानाने राज्यकर्त्यांना घालून दिली
आहे. तशी व्यवस्था निर्माण करण्याचे मार्गदर्शन ते नक्कीच करतं. हे करताना
राज्यघटनेने देश चालवावा हे अपेक्षित नाहीये. तर त्याच्या मार्गदर्शनाने लोकांनी
म्हणजेच आपण आपल्या (आपल्या म्हणजे आपल्या जातीधर्माच्या नव्हे तर भारतीयांच्या)
लोकांसाठी देश चालवावा, अशी अपेक्षा आहे. हे करताना घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब
आंबेडकर आणि त्यांच्या टीमने संविधानाची ओळन् ओळ एका कुटुंबाच्या पातळीवर जाऊन
विचार केलेला दिसतो हे आपल्या देशाच्या जडणघडणीचं वैशिष्ट्य आहे. हे सर्वकाही आपलं
पुस्तक खूप उत्तमरित्या सांगतं याचा वेगळा आनंद आज मनात दरवळतो आहे. हे पुस्तक लहान
मुलांना संविधान म्हणजे काय हे समजावून सांगण्यासाठी तयार झालं असलं तरी ते
प्रत्येक पालकानं वाचावं असं आहे. अर्थात, ते आधी पालकांनी वाचून त्या नियमांत,
शिस्तीत आपण आपलं कुटुंब पुढे जातं आहे का? की प्रत्येक गोष्टीत स्वार्थ डोकावतोय
हे तपासून पाहिलं पाहिजे. संविधान हे एक देश चालविण्याचं कायदा पुस्तकच नाही तर
प्रत्येक कुटुंबासाठी जगण्याचा धर्मग्रंथ आहे, असं मला वाटतं यावर आज शिक्कामोर्तब
झाले आहे. यासाठी आपले धन्यवाद आणि सुभाष वारे सरांमुळे हा अनुभव घेता आला याबद्दल
त्यांचेही आभार.
रमेश पडवळ
नासिक
नीलम
माणगावे लिखित "साईड इफेक्टस" ही कादंबरी वाचायला मिळाली.कादंबरीने विचार
करायला व लिहायला प्रवृत्त व प्रोत्साहितही केले. या कथेवर चर्चा परिसंवाद वादसंवाद
व भरपूर लिखाण होऊ शकते.यातील प्रत्येक कॅरेक्टर व प्रसंगावर चिंतन व विचार मंथन
केले जाऊ शकते.
जशी ही कथा वाचायला सुरुवात केली तशी या कथेने मनावर बुद्धीवर एक पकड घट्ट केली.
खिळवून ठेवलं. कुतुहल जिज्ञासा उत्सुकता वाढतच गेली .कोणतेही साहित्य वाचताना एक
मनोरंजन आणि दुसरं म्हणजे काय शिकायला मिळतं हे दोन बेसिक हेतू असतात . साईड
इफेक्टस वाचताना आश्चर्यकारक धक्के मिळत गेले.बाप रे समाजात अशाही घटना घडत आहे.
अवाक झाले विचार करायला लागले कथानक जसं पुढे सरकलं तसं मनात बेचैनी अस्वस्थता
उत्कंठा वाढत राहिली आता काय होणार पुढे काय होणार असं वाटत राहीलं.
सर्व स्त्रियांची भूमिका अगदी योग्य वाटली त्यांची चूक मला वाटली नाही पण समाज कसा
विचार करतो आणि करत आला आहे त्यांच्या स्त्रिया कडून अपेक्षा या शतकानूशतकं त्याच
आहेत तशाच आहेत.पुरुषी अहंकार खोलवर मुरलेला आहे. स्त्रियांचा सुखासाठी वापर करायचा
त्यांच्या भावनांशी खेळायचं हवं तेवढं मनोरंजन करून घ्यायचं भूक भागली कि त्यांच्या
आयुष्याशी खेळायचं त्यांची फसवणूक करायची पाठीत सुरा खूपसायचा मानसिक खच्चीकरण हे
शतकानुशतके होतच आलं आहे पण या कथेमध्ये स्त्रियांनी एकवटून जेव्हा जयराम चा खून
केला त्याला जीवे मारलं तेव्हा खूप बरं वाटलं त्याला योग्य शिक्षा मिळाली.
एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीही चित्तथरारक कथा पुढे अजून उत्कंठावर्धक होत जाते
पुरुष स्वतःवर सगळं ओढून घेतात व अटक होतात ते खूप महान नवरे होण्याचा प्रयत्न
करतात कि खून करणं स्त्रियांचं काम नाही ते आपणाला शोभून दिसते असा त्यांचा विचार
असावा असं मला वाटलं.पण त्यांचं वागणं नंतर वेगळंच आहे.
प्रत्येक स्त्रिया मनातील खऱ्याखुऱ्या भावना, त्यांचा प्रामाणिकपणा, बेचैनी आतल्या
आत होणारी घुसमट अगदी अचूक शब्दातून हुबेहूब मांडली आहे. त्यांची उलाघाल घुसमट
प्रत्येक ठिकाणी वाचक अनुभवतो .प्रत्येक स्त्रीची वेगळी पार्श्वभूमी मानसिकता व
घटनेचे पडसाद वेगवेगळ्या कोनांतून अत्यंत ताकदीने व कौशल्यपणाने मांडले आहेत. तिथेच
लेखिकेने यशाचे शिखर पार केले आहे . अनेक मुलींच्या आत्महत्या होतात लग्न मोडतात पण
प्रिया सर्वांना सावरते. आधार देते .प्रबोधन करायला सुरुवात करते.तिथं मनाला थोडा
दिलासा मिळाला
. जयरामच्या पत्नीचा प्रवास वाईटाकडून चांगुलपणाकडे दाखवला आहे. तिच्यात खूप मोठा व
चांगला बदल घडतो. तो पटलाही.वास्तवाचे विदारक चित्रण करत शेवटी समाजाला अतिशय
चांगला संदेश ही कादंबरी देते .स्त्री पुरुष समानतेबद्दल विचार करायला भाग पाडते .
'आम्ही का नाही?' असा ठणकावून प्रश्न विचारते ते खूप मोठे समाधान देणारं लेखिकाचं
यश आहे असं मला वाटतं स्त्रियांमधील भावनाशीलता जेवढी हळुवार व नाजूक दाखवली आहे
तेवढीच ती धीट खंबीर व खमकी वाटली. ग्रामीण भागातील स्त्री तिच्यात असलेला सर्व
गुणदोषांसहित मूळ स्वरूपात पाहायला मिळाली त्यांच्यातील शहाणपणा एकजुटीची व समजावून
घेण्याची वृत्ती असते हे प्रकर्षाने जाणवत राहतं. आशावादी सकारात्मक समारोपाने
वाचकाला एक दिलासा मिळतो सर्व भावनांचं कॅथारसीस होतं.
साईड इफेक्ट्स वाचून खूप अस्वस्थ झाले स्त्रियांनी काय करायचं कसं वागायचं कुठे
जायचं असं कोडं पडलं.त्याग घुसमटीची परंपरा पाळावी अशी अजूनही तिच्याकडून अपेक्षा
ठेवली जाते. ती माणूस आहे तिला पुरुषांसारख्याच भावभावना असू शकतात तेवढ्याच
प्रमाणात असू शकतात कोणी हे अजूनही स्वीकारत नाही. स्त्री पुरुष समानता कधी येईल की
नाही? कथा अशी मांडली आहे की कोण चुकते लवकर कळत नाही स्त्रिया दोषी की एक पुरुष
दोषी की समाज व्यवस्थेचा दोष? असा प्रश्न पडतो.स्त्रियांनी उचललेल्या पाऊल बरोबरच
होतं. परिणाम पडसाद तर सारे अपेक्षित व स्वभाविकच आहेत पण हकणाक बळी गेला जात आहे
युगानुयुगे तो स्त्रीच्या आत्मसन्मानाचा तिच्या भावनांचा. तिला वासना लैंगिक भावना
खूप जास्त किंवा ठराविक परिस्थितीत असता कामा नये ती पूर्तता करू शकत नाही तिला
दमनच करावे लागेल नाहीतर भयंकर परिणाम भोगावे लागतात. अहंकारी पुरुषी मानसिकता किती
खोलवर कीड लागल्यासारखी रुजलेली आहे हे दिसतं. समाजातील अज्ञान, ढोंगीपणा ,
मागासलेले विचार यामुळे स्त्रियांना अजूनही यातना भोगाव्या लागतात. अशा प्रकारचं
लेखन आवाज उठवून स्त्रीमनाला एक नवी दिशा व आशा देते. 'हो आम्ही ही करू शकतो' जाऊ
शकतो सगळ्या सीमा ओलांडून तुमच्या एक पाऊल पुढे व काळाच्याही.
एक वेगळी कथा वाचायला मिळाली व ती खूप खूप आवडली. माणगावे मॅडम तुमचं खूप खूप
अभिनंदन . खूप खूप धन्यवाद.
स्वाती माने
कोल्हापूर