नीलम माणगावे या मराठीतील प्रतिथयश लेखिका आहेत कथा, कविता, कादंबरी, लोकसाहित्य,
आत्मकथन, सामाजिक, वैचारिक लेख, प्रवासानुभव, संपादन- समीक्षात्मक वगैरे साहित्य
प्रकारामधून विपूत लेखन केलेले आहे. प्रौढसाहित्याबरोबर बालसाहित्यही लिहिले आहे.
आजपर्यंत त्यांची ७३ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले
अहित. त्यांच्या तीन पुस्तकांना महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार, मिळाला आहे.
त्याशिवाय राज्यस्तरीय अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अभ्यासक्रमामध्ये त्यांच्या कथा,
कवितांचा समावेश झाला आहे त्याच्या साहित्यिक सेवेबद्द्ल अधिक माहिती घेण्यासाठी
त्यांच्या प्रकाशित पुस्तकांना भेट दया.
कवी संमेलनाध्यक्ष, साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून त्यांची अनेकवेळा निवड झालेली
आहे. तसेच २००७ मध्ये मॉरिशिअस् येथिल अखिल भारतीय बहुभाषिक कवयित्री संमेलनामध्ये
त्यांचा सहभाग होता. आकाशवाणी सांगली, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद रेडिओ
केंद्रावर कथाकथन, कवितावाचन, कौटुबिंक श्रृतिकाचे अनेक वेळा लेखन केले आहे. केसरी,
लोकमत, जनस्वास्थ, रोहिणी, ऋग्वेद, मिळून साऱ्याजणी वगैरे नियतकालिकातून सदर लेखन
केले आहे. सहसंपादक म्हणून 'प्रगति आणि जिनविजय' आणि 'तीर्थकर मासिकामध्ये सहसंपादक
म्हणून त्या कार्यरत आहेत. मासिक इंद्रधनुष्य मध्ये सल्लागार आहेत. अनेक साहित्य
संमेलनामधून कथाकथन, कवितावाचन केले आहे. परिसंवादामध्ये बोलण्याची संधी मिळाली
आहे. कर्नाटक राज्यातील १० वी च्या (मराठी माध्यमाच्या) पाठ्यपुस्तकामध्ये 'सत्कार'
कथेचा समावेश केलेला आहे.
महाराष्ट्र राज्याच्या १२ वी च्या पाठ्यपुस्तकामध्ये 'स्पर्श' कथेचा, डॉ.
बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, औरंगाबाद बी. ए. भाग एक मध्ये (बहिस्थ) प्रसाद
कथेचा समावेश, मुंबई विद्यापीठाच्या बी. ए. भाग - २ साठी 'जसं घडलं तसं' या
आत्मकथेचा समावेश, महाराष्ट्र राज्य ११ वी पाठ्यपुस्तकात पैंजण' कवितेचा समावेश,
महाराष्ट्र स्टेट बोर्ड (लोअर मराठी) ५ वी च्या पाठ्यपुस्तकामध्ये 'कोणापासून काय
घ्यावे' या कवितेचा समावेश आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर एम. ए. भाग १, पार्ट १
मध्ये 'पळ सोने पळ' या बालकथा संग्रहांचा समावेश केला आहे. कथासंग्रह आणि
कवितासंग्रहांवर दोन प्राध्यापकांनी एम. फिल केले आहे. 'शांते तू जिंकलीस' या
कथासंग्रहाला, 'डॉलीची धमाल' या बालकादंबरीला आणि 'निर्भया लढते आहे' या कथासंग्रहाला
महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. 'साक्षीदार' या कथासंग्रहाला
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिकचा बाबुराव बागूल पुरस्कार मिळाला आहे.
'खचु लागली भुई' या कविता संग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचा कुसुमाग्रज
पुरस्कार मिळाला आहे. एकूण कविता लेखनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचा
ना. घ. देशपांडे ग्रंथ पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय राज्यस्तरीय ५४ पुरस्कार
मिळाले आहेत.